सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून ९०० हेक्टर शेतजमीन पाण्याने खरडून निघाली. शंभरच्या वर घरे उद्ध्वस्त झाली. नदीकाठी असलेली जवळपास ६० कुटुंबे बेघर झाली, तर तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. सिल्लोड तालुक्यात गुरुवारी १५७.८८ मि.मी., तर शुक्रवारी ६८.६३ मि.मी. असा २२६.५१ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यातील बनकिन्होळा, गेवराई सेमी, सोयगाव तालुक्यातील शंभरच्या वर घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६० कुटुंबे बेघर झाली आहे. बेघर झालेल्या कुटुंबांना गावातीलच जि.प. च्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. त्यांची जेवण्याची व्यवस्था केली आहे. ६० गावातील अंधार मिटला...तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोळेगाव, पानवडोद, उंडणगाव, आमठाणा, भराडी सर्कलमध्ये ४८ लघुदाब वाहिनी व ११ केव्ही विजेचे १७ खांब पडले होते. जागोजागी तारा तुटल्या होत्या. गोळेगाव, पानवडोद, उंडणगाव परिसरात ३ ट्रान्सफार्मर फेल झाले होते. यामुळे तालुक्यातील ६० गावे अंधारात होती. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ए. एस. गायकवाड, कनिष्ठ अभियंता व तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून भर पावसात पोल उभे केले. त्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत बाधित ६० गावांचा वीजपुरवठा सुरू झाला. पंचनामे करण्याचे आदेशतहसीलदार राहुल गायकवाड यांनी तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांना तात्काळ नुकसान पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.तालुक्यात कोट्यवधींचे नुकसानआ. अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, अतिवृष्टीची मी तात्काळ पाहणी केली. कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सिल्लोड तालुक्यात झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे यात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुन्हा आर्र्थिक संकटात सापडला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना व बेघर झालेल्या नागरिकांना भरघोस मदत करावी.सरकारी यंत्रणा लागली कामालातालुक्यातील बांधकाम विभाग, पंचायत समिती, जि.प. महसूल, कृषी विभाग व विविध विभागांचे सर्व कर्मचारी नैसर्गिक आपत्तीच्या कामाला लागले आहेत. तालुक्यातील गरजूंना ते मदत करून आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना धीर देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. येत्या दोन दिवसांत झालेल्या नुकसानीचा मूळ आकडा समजेल, असे उपजिल्हाअधिकारी दीपक धाडगे यांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार
By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST