वाशी : तालुक्यातील घोडकी मार्गावर बेवारस अवस्थेत असलेले विदेशी दारूचे तब्बल १३० बॉक्स वाशी पोलिसांनी जप्त केले़ ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे़ दरम्यान, पकडलेला मुद्देमाल हा पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्यातील असल्याचे समजल्यानंतर शनिवारी हा मुद्देमाल पंढरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील घोडकी मार्गावर बेवारस अवस्थेत दारूचे बॉक्स असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती़ ही माहिती मिळताच पोनि महानोर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील कर्मचारी विजय सुंटनुरे, पांचाळ, जाधवर अदींनी घोडकी मार्गावरील घटनास्थळी जावून तब्बल १३० दारूचे बॉक्स ताब्यात घेतले़ या बॉक्सची माहिती काढत असताना पोलिसांना समजले की, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंटेनरला पीकअप अडवा लावून त्यातील विदेशी दारूचे बॉक्स ९ मे रोजी चोरण्यात आले होते़ तर पिकअपमध्ये नेवून दुसऱ्या दिवशी सोडून देण्यात आले होते़ या प्रकरणी पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पंढरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली़ वाशी तालुक्यातील कासारखानी शिवारातील राजा गुलाब काळे व कळंब तालुक्यातील हासेगाव येथील अनिल रामा काळे या दरोडाखोरांच्या टोळीनी सिंग्राम येथील दारूच्या कंपनीतून सोलापूर येथील मुख्य वितराकाकडे जाणारा कंटेनर पळवून नेल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर ग्रामीण पोलिसांचे पथक मागील आठवड्यापासून कळंब, वाशी हद्दीत चोरट्यांचा शोध घेत फिरत होते़ वाशी पोलिसांना कासारखानी शिवारातील राजा काळे याच्याकडे दारू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी हलचाली सुरू केल्या होत्या़ मात्र, पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच राजा काळे हा घोडकी मार्गावर दारूचे बॉक्स टाकून पळून गेला़ (वार्ताहर)पोलिसांनी कळंब तालुक्यातून तब्बल ६०० बॉक्स दारू जप्त केल्याची माहिती स्थागुशाच्या अधिकाऱ्यांनी दिली़ या दरोड्यातील हासेगाव येथील आरोपी पोलीसाच्या जाळ्यात सापडला असून, इतर आरोपिंचा शोध सोलापूर, पंढरपूरसह उस्मानाबाद पोलीस घेत आहेत़ संबंधित आरोपिंच्या विरूध्द दरोड्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, राजा काळेच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हाही दाखल झालेला आहे.
विदेशी दारुचे बॉक्स जप्त
By admin | Updated: May 22, 2016 00:02 IST