लातूर : व्यायामात सातत्य ठेवल्याने त्या व्यक्तीमध्ये दु:ख सहन करण्याची ताकद निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने व्यायाम अंगीकारला पाहिजे. शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठीही व्यायामाचे महत्त्व मोठे आहे, असे प्रतिपादन डॉ. अतुल निरगुडे यांनी येथे केले. महाराष्ट्र जैन इतिहास परिषद व सकल जैन समाज लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहाव्या अधिवेशनात ‘आरोग्यम् सुखसंपदा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रतिभा सनतकुमार अन्नदाते होत्या. मंचावर प्राचार्य जी.बी. शहा, प्राचार्य अजित पाटील, प्रा.डॉ. सुजाता शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ. निरगुडे म्हणाले, व्यायामाबरोबर आयुर्वेदाचेही महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासात जैन दर्शन आहे. प्रत्येक औषधांत अनेक घटक असतात. त्यामुळे आयुर्वेदाचेही महत्त्व कायम राहिले आहे. येत्या काळात आयुर्वेदाचे स्वतंत्र अधिवेशन घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘आरोग्यम् सुखसंपदा’ या पुस्तकाच्या माध्यमातून मानवी आरोग्याच्या कल्याणाची माहिती दिली जाते. औषध खाऊन आरोग्य टिकेल, हे शक्य नाही. परंतु, जैन सिद्धांतांना छेद होऊ न देता आयुर्वेदाचे काम सुरू असल्याने आयुर्वेदाचे महत्व वाढत असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक नागरिकाने दैनंदिन आहार घेत असताना आहाराची वेळ निश्चित करावी. त्यात प्रामुख्याने जेवणाची वेळ ही दुपारची असावी. शारीरिक श्रम कमी त्यांनी दिवसामध्ये दोनदा आहार घ्यावा. आहार हा बेताचा आणि सावकाश घ्यावा. त्यामुळे आरोग्य चांगले राहील. व्यायामाच्या प्रक्रियेमुळे मनावर नियंत्रण राहते. त्यामुळे आत्महत्येसारख्या घटनांनाही आळा बसू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ही दिनचर्या कायम ठेवली तर आरोग्य कायम चांगले राहील, असा विश्वासही डॉ. निरगुडे यांनी व्यक्त केला. सुनीता सांगोले यांच्या अध्यक्षीय भाषणाने पाचव्या सत्राचा समारोप करण्यात आला. प्रारंभी जैनेंद्र तूपकर यांनी केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.डॉ. सदाशिव दंदे यांनी केले. प्रमुख मान्यवरांचा परिचय पद्मावती कडतने यांनी करून दिला. डॉ. कुलभूषण कंडारकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
व्यायामामुळे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य मिळते
By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST