उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा केवळ ५८ टक्के पाऊस झाल्याने २८ प्रकल्प कोरडे असून, ६६ प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली असल्याने येणाऱ्या दिवसात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. अशावेळी उपलब्ध पाणीसाठ्याची जपवणूक करण्याची आवश्यकता असताना अनेक प्रकल्पातून अवैध पद्धतीने पाण्याचा बेसुमार उपसा सुरु असल्याचे चित्र आहे. टंचाई निवारणार्थ लाखोंचे आराखडे तयार होत असताना प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य संरक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख प्रकल्पावर मंगळवारी भेट दिली असता, अनेक ठिकाणी विद्युत मोटारींद्वारे शेतकरी पाणी खेचत असल्याचे दिसून आले.पांडुरंग पोळे ल्ल नळदुर्गप्रशासन संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी लाखोंचे आराखडे तयार करीत असताना धरणातील उपलब्ध पाण्याची जपवणूक करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शेजारच्या बोरी धरणातून दररोज लाखो लिटर पाणी खेचले जात असून, अनधिकृत विद्युत पुरवठ्यामुळे विद्युत वितरण कंपनीलाही दररोज हजारो रुपयांचा चुना लागत आहे.यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक तलाव, धरणे कोरडी आहेत. सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या बोरी धरणात आज रोजी २० टक्के पाणीसाठा असून तो एकूण साठवण क्षमतेच्या अवघा ६.५ दसलक्ष घनमिटर इतका आहे. येणाऱ्या ८ महिन्यांच्या काळाकरिता या धरणातून तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर गावांना पाणी पुरवठा करावयाचा आहे. दरमाणसी प्रतिदिनी ४० लिटर पाण्याचा विचार करता, या धरणातून केवळ ६ महिने पाणी मिळू शकते. असे असताना पाटबंधारे विभाग पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत उदासीन असल्याचे दिसते. सध्या धरणावर जवळपास १५० विद्युत मोटारी आहेत. मात्र विद्युत वितरण कंपनीने केवळ ९७ ग्राहकांना विद्युत पुरवठा केला आहे. उर्वरित ५३ कनेक्शन हे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेहरबानीवर सुरु असल्याची चर्चा आहे.पाटबंधारे विभागाकडे असलेल्या नोंदीतही लाभार्थी संख्या कमी आहे. मात्र वास्तवात ती त्याच्या अभिलेखावरील संख्येच्या दुप्पट असल्याचे बोलले जाते. या सर्वच प्रकाराकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. आहे त्या पाण्याचा जपून वापर न करता पाणी टंचाईवर कोट्यावधी रुपयाची उधळण करण्यासाठीच हा कानाडोळा असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. धरणावर लावलेल्या मोटारीतून अशाचप्रकारे पाणी उपसा राहिल्यास नागरिकांना येणाऱ्या काळात गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणातील पाणी साठ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत कसल्याही सूचना मिळाल्या नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या नळदुर्ग कार्यालयाने दिली.
बेसुमार उपसा सुरुच..!
By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST