परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या पेपरफुटी प्रकरणात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावून सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. आ. डॉ. राहुल पाटील यांनी यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी परिचर या पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, हा पेपर फुटल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. या प्रकरणात पोलिसांनी लाठीमारही केला होता. दरम्यान, आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उचलून धरला. १९ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील होते. अगोदरच दुष्काळाने होरपळून निघालेल्या या विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याने मन:स्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि त्यांच्या येण्याजाण्याचा खर्च शासनाने परत करावा आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी करावी, यापुढे सेंट्रलाईज आॅनलाईन परीक्षेचे आयोजन करावे, अशी मागणी आ. पाटील यांनी केली होती. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी याप्रकरणी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावून जे विद्यार्थी या पदाची पुन्हा परीक्षा देणार नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
परीक्षा शुल्क परत केले जाईल
By admin | Updated: December 20, 2015 23:36 IST