उस्मानाबाद : हजार-पाचशेच्या नोटा बाजारातून बाद करण्याच्या निर्णयाचे पडसाद बुधवारी जिल्हाभरात दिसून आले. एरव्ही गजबजून असणाऱ्या शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी नव्हती. विशेष म्हणजे, जे काही व्यवहार झाले, तेथेही सुट्या पैशांवरून वादावादी झाल्याचे बसस्थानक, बाजार समितीसह पेट्रोलपंपावरही चित्र होते. सराफा दुकाने उघडी असली तरी तिकडेही ग्राहक फिरकले नाहीत. बहुतांश सराफा व्यापाऱ्यांनी दुकानाच्या दर्शनी भागावर हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारणार नसल्याचे फलक लावल्याचे चित्र होते. रुग्णालय तसेच औषधी दुकानांमध्ये ७२ तासांच्या कालावधीत जुन्या नोटांवर व्यवहार चालणार आहेत. मात्र, तेथेही सुट्या पैशांवरून तणावाचे वातावरण होते. उपचारासाठी व औषधी घेण्यासाठी येणाऱ्या बहुतांश रूग्णांच्या नातेवाईकांनी पाचशे ते एक हजार रूपयांच्या नोटा आणल्या होत्या़ १०० ते ५० रूपयांसह चिल्लरची अडचण निर्माण झाल्याने ‘अॅडजेस्टमेंट’ करून व्यवहार करावे लागले़ ओळखीच्या ग्राहकांना उधारीवर औषध देण्याचा पर्याय केला़ रूग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील औषधी दुकानदारांनी सहकार्य केल्याचे औषध विक्रेते शाम जहागीरदार यांनी सांगितले़नोटांवरील बंदीचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून आला. उस्मानाबादसह कळंब, मुरूम, उमरगा बाजार समितीत दररोज लाखोंची उलाढाल होत असते. परंतु, बुधवारी येथील व्यवहारही मंदावले होते. किरकोळ व्यापाऱ्यांचे अपवाद वगळता मोठ्या आडतीवरील व्यापाऱ्यांचे वजन काटे बुधवारी हललेच नाहीत. शेतकऱ्यांचा माल घ्यावा तर त्यांना हजार, पाचशेचे चलन द्यावे लागले असते़ परंतु, नोटा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या नोटा घेतल्या नसत्या. त्यामुळे काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी व्यवहार न करणेच पसंत केले. वैद्यकीय सेवेप्रमाणेच पेट्रोलपंपावर देखील ७२ तासांपर्यंत नोटा स्वीकारण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून जिल्ह्यातील पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परंतु, प्रत्येक ग्राहक हजार-पाचशेचीच नोट काढत असल्यामुळे पंपधारकांसमोर चिल्लरचे वांधे निर्माण झाले. यावर पर्याय म्हणून पाचशे रुपयांचेच पेट्रोल भरण्याची सक्ती ग्राहकांना करण्यात येत होती. त्यामुळे दुचाकींसह ट्रक, टेंम्पो, काळी-पिवळी प्रवासी बस, दुचाकी या विविध वाहनांनी डिझेल-पेट्रोल भरुन आापल्याकडील हजार-पाचशेच्या नोटा उपयोगात आणल्या.
प्रत्येकालाच हवी चिल्लर
By admin | Updated: November 10, 2016 00:02 IST