छत्रपती संभाजीनगर : शाळेतील मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेले आहेत. त्यांना आई-वडिलांनी सांगितल्यानंतरही ते समजून घेत नाहीत. त्यामुळे मुलांच्या प्रबोधनाचा यज्ञच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोकरदन येथील न्यू हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेले शिक्षक बी. के. वाणी यांनी १३ वर्षांपासून सुरू केला आहे. आतापर्यंत त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील १ हजार १७ शाळांमध्ये जाऊन विनाशुल्क ‘आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन कसे जगावे’ यावर मार्गदर्शन केले आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत हेच कार्य करीत राहण्याचा निर्धारही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
शाळेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक पालकांनी मुलांच्या समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यात मोबाईलवर जास्त वेळ घालवणे, गेम खेळण्यात गुंतून राहणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे, वेळेवर न झोपणे, आरोग्याची काळजी न घेणे अशा अनेक समस्यांचा समावेश होता. त्यातून मुलांना शाळेत याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे २०१२ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन कसे जगावे’ यावर शाळेमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आतापर्यंत तब्बल १ हजार ४७ शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचेही ते सांगतात. याविषयी त्यांनी शाळेतील कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांकडून अभिप्रायही घेतले आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना हव्या भाषेत समजावून सांगितले. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील दिसणारा आनंद हा सर्व समाधान देणारा असतो, असेही वाणी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना हे करायला सांगतातसेवानिवृत्त शिक्षक बी. के. वाणी हे शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सकाळी सूर्योदयाला सूर्यकिरणांकडे पाहिल्याने व सूर्यनमस्काराने शरीर निरोगी राहते. भाजी, फळे, दूध यांचे सेवन शरीरासाठी किती उपयुक्त आहे. तेलकट व जंक फूड का टाळावे, मोबाईल, टीव्ही व संगणकावर मर्यादित वेळ घालवणे का महत्त्वाचे आहे. जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यावर व मेंदूवर होणारे परिणाम, क्रीडा, व्यायाम, योग यांचे जीवनातील महत्त्व आणि पालक व शिक्षकांप्रती आदर, शिस्तबद्ध जीवनशैली आणि निसर्गाशी नाते जपणे याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.