औरंगाबाद : शेतकरी गटांच्या माध्यमातून एकत्रित आलेले जिल्ह्यातील काही शेतकरी लवकरच स्वत:च्या कंपनीचे संचालक होणार आहेत. अडीचशे शेतकरी गटांच्या उत्पादक वेगवेगळ्या संघांनी कंपनी कायद्यांतर्गत १३ कंपन्यांची नोंदणी केली आहे. सर्व १३ शेतकरी उत्पादक कंपन्या जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्याने स्थापन होत आहेत. सहा कंपन्यांच्या सामूहिक सुविधा केंद्रांचे बांधकामही पूर्ण होत आले आहे. त्यामुळे या सहा कंपन्या एप्रिल महिन्यातच कार्यान्वित होणार आहेत. समूह शेतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मागील अडीच वर्षांपासून गावोगावी शेतकरी गटांची स्थापना केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात असे ४,२३५ गट स्थापन झाले आहेत. या गटांना शेतीपर्यंत शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणे, त्यांना वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देणे आदी कामे होत आहेत. आता त्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी शेतकरी गटांना खाजगी कंपन्या स्थापन करून दिल्या जात आहेत. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत शेतकरी गटांचे १३ उत्पादक संघ स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक उत्पादक संघात २० शेतकरी गट आहेत. उत्पादक संघांची स्थापना झाल्यानंतर जागतिक बँकेच्या मदतीने कंपनी कायद्यांतर्गत प्रत्येक उत्पादक संघाची एक याप्रमाणे १३ कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या कंपन्यांमध्ये शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंग केली जाणार आहे. जागतिक बँकेकडून प्रत्येक कंपनीला १३ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले आहे. शिवाय त्यात उत्पादक संघाचे म्हणजे शेतकरी गटांचे ४ लाख ५० हजार रुपये असणार आहेत.अशा प्रकारे १८ लाख रुपयांच्या निधीतून एका कंपनीची सुरुवात होत आहे. सध्या या कंपन्यांच्या सामूहिक सुविधा केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. ते पूर्ण होताच त्यात मशिनरी बसवून या कंपन्या कार्यान्वित होतील. सध्या सिल्लोड तालुक्यातील भराडी, कन्नड तालुक्यातील वाकद व नागद, खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर व मलकापूर आणि पैठण तालुक्यातील बन्नीतांडा, या सहा कंपन्यांच्या सुविधा केंद्रांचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे या सहाही कंपन्या एप्रिलमध्येच कार्यान्वित होणार असल्याचे आत्माचे प्रकल्प उपसंचालक सतीश शिरडकर यांनी सांगितले.
अडीचशे शेतकरी गटांच्या १३ कंपन्यांची स्थापना
By admin | Updated: March 26, 2016 00:57 IST