लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी महावितरण आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत ९ आणि १० जुलै रोजी झालेल्या बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. उद्योजकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन संबंधित प्रशासनातर्फे देण्यात आले.मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (मसिआ) च्या वाळूज येथील कार्यालयात मंगळवारी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर आणि ‘एमएसईटीसीएल’चे मुख्य अभियंता अविनाश कोंडावार यांच्या उपस्थितीत शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज येथील उद्योजकांची बैठक झाली. यावेळी ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, माजी अध्यक्ष सुनील किर्दक, सुमित मालानी, विनय राठी, मनीष अग्रवाल, राजेंद्र चौधरी, किरण जगताप, भगवान राऊत, विकास पाटील, अर्जुन गायकवाड, सर्जेराव साळुंके, सुरेश खिल्लारे, शरद चोपडे उपस्थित होते.चिकलठाणा एमआयडीसीत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. येथील रेडियंट अॅग्रो आणि अन्य फिडरची दुरुस्ती करण्यात यावी, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दुरुस्ती व देखभाल केंद्र सुरूकरणे, वाळूज येथील गट क्रमांक २२ व २३ मधील उद्योजकांना वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त फिडरची व्यवस्था करणे, पावसाळ्यात पुरवठा सुरळीत ठेवणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी गणेशकर यांनी ही कामे दोन ते महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
उद्योजकांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:23 IST