लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा शनिवारी रात्री उशिरा लातुरात पोहोचली आहे़ ही यात्रा रविवारी सकाळी ११ वा़ उजनी येथे पोहोचणार असून तिथे सभा होणार आहे़गेल्या तीन वर्षांतील दुष्काळामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे़ यंदा भरपूर पाऊस झाला असला तरी शेतीमालाला बाजारपेठेत भाव मिळत नाही़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी शासनाकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी केली़ मात्र, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नसल्याचे सांगत आहेत़ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षांनी अखेर संघर्ष यात्रा काढण्यास सुरूवात केली आहे़ ही संघर्ष यात्रा शनिवारी रात्री उशिरा लातुरात मुक्कामी दाखल झाली आहे़ रविवारी सकाळी या संघर्ष यात्रेचे उजनीकडे प्रस्थान होणार आहे़ तिथे सकाळी ११ वा़ सभा होणार आहे़ यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ़ जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे आ़ आबू आझमी, माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासह आ़ अमित देशमुख, आ़ त्रिंबक भिसे, माजी आ़ बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अॅड़ व्यंकट बेद्रे आदींची उपस्थिती राहणार आहे़
लातुरात संघर्ष यात्रा दाखल
By admin | Updated: April 2, 2017 00:22 IST