पळशी : तालुक्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर संपावर असल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर तासाभरात गायीचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील पळशी शनिवारी घडली.
पळशी येथील गट क्रमांक २७१ मधील अंबादास पुंगळे यांच्या मालकीच्या गोठ्यात त्यांची गाय बांधलेली होती. या गायीला सापाने चावा घेतल्याचे अंबादास पुंगळे यांच्या निदर्शनात आले. डोळ्यादेखत गाय तडफडत होती. खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावणी केली. परंतु त्यांना सरकारने परवानगी नाकारल्याने त्यांनी येण्यास नकार दिला. तब्बल चार जणांना फोनवरून संपर्क करण्यात आला. परंतु सगळ्यांकडून एकच उत्तर मिळत होते. आमचा संप आहे आम्ही येऊ शकत नाही. बळीराजा उपचारासाठी जवळपास चार तास सैरावैरा धावला. पंरतु उपचार मिळत नसल्याने बळीराजाची गाय तडफडून मुत्युमुखी पडली.
--
अन् अश्रूंना पाझर सुटला
शेतकरी अंबादास पुंगळे यांच्या डोळ्यातून आश्रुंना पाझर फुटला. पंरतु डॉक्टरांना पाझर नाही फुटला. या घटनेमुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांचा संप नसता तर नक्कीच गायीचे प्राण वाचले असते. आता प्रशासनाने याची दखल घेऊन त्या शेतकऱ्यास मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.