मोहनदास साखरे , मांडवा महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळातर्फे अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार यांच्यासाठी जागा राखीव असतात. प्रत्यक्षात या राखीव जागेच्या आसनामागे कोणासाठी राखीव आहे, असे लिहिलेले असते. परंतु बसचा वाहक या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने अंध, अपंगांसह महिला प्रवाशांना राखीव जागेऐवजी उभा राहून प्रवास करावा लागत आहे. राज्य महामंडळाच्या प्रवासी बसमध्ये ठराविक आसन हे राखीव असतात. या आसनांच्या मागे ते कोणत्या व्यक्तींकरीता राखीव आहे हे नमूद आहे. तसेच ज्या आसनामागे नाव नसेल त्या सर्व जागा या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत, असे समजण्यात येते. राज्य परिवहन महामंडळाद्वारे याच उदात्त हेतूने बसमध्ये राखीव जागा ठेवल्या असल्या तरी वाहकाद्वारे अंमलबजावणी होत नसल्याने महामंडळाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. सध्या लग्नसराईची धूम आहे. बसस्थानकात प्रवाशांची झुंबड उडत आहे. स्थानकात बस येताच मिळेल ती जागा बळकाविण्याकरिता प्रवाशांची बरीच धावपळ होते. विशेष म्हणजे वृद्ध, अपंग, महिला यांना डावलत तरुण मंडळी जागा मिळविण्यासाठी धडपड करतात. खिडकीतून रुमाल, दुपट्टा, कॅरीबॅग टाकून ती जागा जणू आरक्षितच झाली, या आविर्भावाने प्रवासी वावरतात. महिला, अंध, अपंग यांना हक्काची जागाही बसायला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे सर्व वाहकांसमोर घडत असतानाही वाहक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच एसटीतील आरक्षित जागांवर अतिक्रमण केले जात आहे.
एसटीतील आरक्षित जागांवर अतिक्रमण
By admin | Updated: May 26, 2014 00:24 IST