जालना : पाचही मतदार संघात प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते दिवसरात्र जीवाचे रान करीत आहेत. नियमित कार्यकर्त्यांसोबतच उमेदवारांच्या शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांमधील कर्मचारी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पाचही मतदार संघात हे चित्र पाहावयास मिळत आहे. भोकरदन, परतूर, घनसावंगी, बदनापूर व जालना विधानसभा मतदार संघात अनेक उमेदवारांच्या शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांचे विस्तीर्ण असे जाळे आहे. मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षक व लिपिक तसेच अन्य कर्मचारी त्यात कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी सकाळीच आपल्या उमेदवारांच्या प्रचारसाठी गावना गाव पिंजून काढत आहेत.प्रामुख्याने काही अनुभवी शिक्षक तसेच प्राध्यापकांकडे प्रचाराचे पूर्ण नियोजन देण्यात आले आहे. वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांकडे सर्व आर्थिक व्यवहार देण्यात आल्याची चर्चा आहे. साहेबांच्या प्रचारात कोणतीही कसुर राहू नये कर्मचारीही सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रचारासाठी फिरत असतात. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे तसेच उमेदवारांचीही धकधक वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात प्रचार करण्यावर मोठ जोर दिला जात आहे. शैक्षणिक संस्थामधील कर्मचाऱ्यांना खास असे नियोजन करुन देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक गावात जाऊन प्रचाराचा धुराळा सुरु आहे. कर्मचाऱ्यांची नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त केले जात आहे. साधारणपणे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी उमेदवारांसाठी झटत आहे. पडद्यामागील कर्मचारी वेगळेच. एकूणच पाच वर्षातून एकदाच साहेब काम सांगत असल्याने कर्मचारीही इमाने इतबारे ही सेवा पार पाडत आहेत. बहुतांशी कर्मचारी त्याच मतदार संघातील असल्याने त्यांनी मतदार संघाच्या रचनेची पूर्ण माहिती असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बरोबरीने हे कर्मचारी कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)
कर्मचारीही उतरले मैदानात
By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST