मांगलादेवी : गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका पोहोचविणारी दारू आणि जुगार गावातून हद्दपार करण्यासाठी मांगलादेवी येथील महिलांनी एल्गार पुकारला आहे. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठरावही घेण्यात आला. एवढेच नव्हे तर गावात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांची नावेही वाचून दाखविण्यात आली. आता पोलिसांच्या भूमिकेवर या महिलांच्या प्रयत्नाचे यश अवलंबून आहे. नेर तालुक्यात येत असलेल्या या गावातील महिलावर्ग अवैधरीत्या विकल्या जाणाऱ्या दारूमुळे आणि जागोजागी सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यामुळे त्रस्त झाला आहे. सायंकाळी घरी परतणारा धनी कशा स्थितीत येईल, याची चिंता त्यांना दिवसभर सतावत असते. शिवाय युवा वर्गही दारूच्या आहारी जात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. दारू ढोसून तर्रर्र झालेल्या लोकांमुळे रस्त्याने ये-जा करणे कठीण होवून बसले आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींनाही याचा त्रास सहन करावा लागतो. कोण कुठे झिंगून पडलेला राहील याचा नेम नाही. या सर्व बाबी आतापर्यंत अनेकदा नेर पोलिसांपुढे मांडण्यात आल्या. परंतु अजून तरी यावर उपाययोजना करण्यात आली नाही. शिवाय गावामध्ये जुगाराचे अड्डेही अनेक ठिकाणी सुरू आहेत. घरातील वापरामध्ये असलेल्या वस्तू विकून मिळालेले पैसे जुगारात मांडले जात आहे. परिणामी कौटुंबिक कलह वाढत आहे. अनेकांचे संसार दारू आणि जुगारामुळे उद्ध्वस्त होत आहे. आता हा प्रकार चालू द्यायचा नाही, असा निर्धार या गावातील महिलांनी केला आहे.ग्रामपंचायत कार्यालयात महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सुशीलाबाई परोपटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेत महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. यापूर्वी सदर महिलांनी नेर पोलीस ठाण्यावर धडक देवून १०० टक्के दारूबंदीची मागणी ठाणेदार गणेश भावसार यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले होते. आता दारू आणि जुगारबंदीचा ठराव घेण्यात आल्याने पोलीस काय भूमिका घेतात याकडे या गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
दारूबंदीसाठी एल्गार
By admin | Updated: January 27, 2015 23:42 IST