कुंटूर : येथील वीजवाहक तारांत बिघाड असल्याचे कारण सांगून तब्बल १७ तास वीज बंद होती़ रात्रभर कुंटूरसह एकूण १७ गावांना अंधारात रहावे लागले़ या प्रकारास कुंटूर ३३ केव्हीचे आॅपरेटर, लाईनमन, तालुक्याचे ए़ ई़, जे़ई़ हे सर्व जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे़येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रात वारंवार वीज बिघाड होत असते़ वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे कुंटूरसह सतरा गावांतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे़ येथील लाईनमन, कर्मचारी तालुक्याला राहतात़ त्यामुळे थोडाही बिघाड झाला की, रात्रभर वीज बंद ठेवली जाते़ कुंटूर ते घुंगराळा या मार्गावर टाकलेली विजेची तार खूप जुनी झाल्याने नेहमीच वीज बिघाड होत असते़ त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो़ परिसरातील विजेचे खांब मोडकळीस आले आहेत़ काही खांब वाकडे - तिकडे झाले आहेत़ त्यामुळे विजेच्या तारा हाताला पोहोचण्याइतक्याच अंतरावर लोंबकळत आहेत़ वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)