बीड : महावितरणकडून मार्च महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेला ग्राहकांचा थंडा प्रतिसाद लाभल्याने मंडळ उद्दिष्टापासून वंचित राहिले आहे. मात्र महिनाभरात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीसाठी अविरत प्रयत्न करीत ३२ कोटींचा आकडा गाठला आहे. गतवर्षीच्या तुलनेत वसुलीचा आकडा वाढला आहे.वाढत्या थकबाकीमुळे यंदा विभागाला उच्च दाब, लघू दाब वाहिनीकरीता वरिष्ठ कार्यालयाकडून ९४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय कार्यालयांना वसुलीचा आराखडा येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून ठरवून देण्यात आला होता. महिनाभरापासून महावितरणच्या अभियंत्यांसह वायरमन दिवस उजाडताच वसुलीसाठी ग्राहकांच्या दारी जात होते. बीड विभागातून १३ कोटी ८४ लाख तर अंबाजोगाई विभागातील लघू दाब वाहिनीवरील ग्राहकांकडून ११ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. विभागात सर्वाधिक थकबाकी अंबाजोगाई तालुक्याकडे असली तरी यंदा केज उपविभागीय कार्यालयांतर्गत अधिकच वसुली झाली असल्याचे कार्यकारी अभियंता मंदार वैंग्यानी यांनी सांगितले.बीड विभागात बीड अर्बनने ६ कोटी, ग्रामीणमधून २ कोटी, गेवराई उपविभाग कार्यालयांतर्गत २ कोटी अशी वसुली झाली आहे. शहरी भागातून वसुलीकरीता प्रतिसाद मिळाला असला तरी ग्रामीण भागातील ग्राहकांनी मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे कार्यकारी अभियंता जी.बी. घोडके म्हणाले.गेवराईतून ‘शॉक’महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाणीपासून ते वीजपुरवठ्यापर्यंतच्या तक्रारी गेवराई उपविभागीय कार्यालयांतर्गत वाढत आहेत. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गाऱ्हाणे करणाऱ्या या तालुक्यातून सरासरी एवढीही वसुली झाली नाही. एकूण वसुलीच्या केवळ १४ टक्के भार या तालुक्याने उचलला असून, बीड विभागात सर्वाधिक थकबाकी गेवराई उपविभागाकडे असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
वीज थकबाकी देतो,भरतो!
By admin | Updated: April 4, 2017 23:16 IST