औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे. याची पूर्वकल्पना शहरवासीयांना दिली जात नाही. परिणामी, दुपारच्या वेळी अचानक वीज गुल झाल्याने आबालवृद्ध हैराण होत आहेत. मान्सूनपूर्व कामे करा; पण त्याची पूर्वसूचना शहरवासीयांना द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या उलट गारखेडा, बीड बायपास, सातारा, मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरात दररोज वीज गुल होत असल्याने छुपे भारनियमन सुरू केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. महावितरणने शहरातील विद्युत पुरवठा व बिल वसुलीची जबाबदारी जीटीएलवर सोपविली. मात्र, शहरात वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात जीटीएलला अपयश आले आहे. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सर्रासपणे शहरात भारनियमन केले जात आहे. दर शुक्रवारी सक्तीने भारनियमन केले जातच आहे. याशिवाय अन्य दिवसांतही शहरातील वेगवेगळ्या भागांतील लाईट दोन ते चार तासांपर्यंत गायब करण्यात येत आहे. औरंगपुर्यातील महेंद्र गजभय्ये यांनी सांगितले की, दुकानातील लाईट कधी गायब होईल याचा नेम नाही. जेव्हा लाईट जाते तेव्हा आम्ही जीटीएलच्या तक्रार केंद्रावर फोन करतो; पण कोणीच दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जवाहर कॉलनीतील अशोक रंजलकर यांनी सांगितले की, दर दोन ते तीन दिवसांआड आमच्या परिसरातील लाईट दिवसा बंद केली जाते. डीपीची पाहणी केली तर तिथे कोणतेही काम सुरू नसते. परिसरात फिरून पाहिले तर जीटीएलचा कोणीच कर्मचारी विद्युत खांबावर काम करताना आढळून येत नाही. मग लाईट कशासाठी बंद केली जाते हेच कळत नाही. सातारा परिसरातील द्वारकादास जाधव या रहिवाशाने प्रश्न केला की, जीटीएलला भारनियमन करण्याचा अधिकार कोणी दिला? आम्ही नियमित वीज बिल भरत असताना आम्हाला भारनियमनाची शिक्षा का? असेच प्रश्न शिवाजीनगर, पुंडलिकनगरातील नागरिकांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तालय असलेल्या शहरात भारनियमन करायचे नाही, असे राज्य शासनाचे धोरण आहे. हा नियम राज्यभर लागू होतो. शहरात वीज गळती व थकबाकीचे प्रमाण वाढल्याने येथे भारनियमन करण्यात यावे, असे पत्र जीटीएलने महावितरणाला पाठविले आहे. औरंगाबादेत भारनियमन करताच येत नाही. जे प्रामाणिकपणे बिल भरतात त्यांना छुप्या भारनियमनाचा फटका बसत आहे, मान्सूनपूर्वीची कामे करावीत; पण त्याविषयी माहिती देणे हे जीटीएलचे काम आहे. -हेमंत कापडिया, प्रतिनिधी, वीज नियामक आयोगशहरातील काही भागात १८ ते ३० टक्क्यांपर्यंत वीज गळती होत आहे व काही भागात ४२ ते ४५ टक्क्यांपर्यंत थकबाकी पोहोचली आहे. शहरात १६९ फिडर आहेत. त्यापैकी ८८ फिडरवर भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी जीटीएलने महावितरणाकडे केली आहे. वीज गळती रोखणे व थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलावी लागणारच आहेत. -समीर पाठक, पीआरओ, जीटीएल
भारनियमन नसतानाही रोजच होते वीज गुल
By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST