परंडा : आठ दिवसांपासून वीज बंद असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील भोत्रा येथील संतप्त महिलांनी सोमवारी वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव घालून आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी चोवीस तासात अडचण दूर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.भोत्रा येथे गेल्या आठ दिवसापासून सिंगल फेजसह थ्रिफेजचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अख्खे गाव अंधारात आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून, घागरभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. आठवडा उलटूनही वीज पुरवठा सुरु होत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी महावितरण कार्यालय गाठून कनिष्ठ अभियंता वाय. आर. जाधव यांना घेराव घातला. यावेळी महिलांकडून प्रश्नांचा भडिमार होत असल्याने जाधवही गोंधळून गेले होते. अखेर राम जाधव यांनी मध्यस्थी करून चोवीस तासात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात जनाबाई कोकाटे, रूक्मिणीबाई कोळी, सविता जाधव, विमल जाधव, शालन शिंदे, उर्मिला कोकाटे, विमल शेंडगे, सुशीला कोकाटे, नीलावती, कांताबाई गोफणे, मंजुळा शिंगाडे, गंगूबाई मेहेर, अनिता शेलार, अनिता लांडगे, मंगल पवार, छाया शेलार यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजकुमार देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अमोल गोडगे, भाऊ शिंगाडे, सुग्रीव शेळके आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)पोलिस ठाण्यासमोर मारला ठिय्यामहावितरण कार्यालयाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर या महिलांनी पोलिस ठाणे गाठून ठाण्याच्या आवारातच ‘गावातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत’, अशी घोषणाबाजी केली. यानंतर प्रवेशद्वारावर काही काळ ठिय्याही मारला. पोलिस निरीक्षक वाकडे यांची भेट घेऊन गावातील दारू, मटका, जुगार तात्काळ बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी वाकडेयांनीही पोलिस उपनिरीक्षक सत्यजीत आवटे यांना तात्काळ छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले.
वीज कंपनीच्या अभियंत्यास महिलांचा घेराव
By admin | Updated: June 24, 2014 00:30 IST