तुळजापूर : नगर परिषदेकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज बिलाचे एकूण २ कोटी ७९ लाख रूपये थकित असून, १५ सप्टेंबरपर्यंत थकीत वीज बिलाचा भरणा नाही केल्यास पथदिवे व पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीने नगर परिषदेला दिला आहे. यामुळे ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसह शहरवासियांना शहर अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झालीअ ाहे. महावितरण कंपनीची नगर परिषदेकडे चालू बिलापोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी असून, यासंदर्भात न. प. ला रितसर नोटीस देऊनही पालिकेने अद्याप बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून पथदिवे व पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा तोडणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. महावितरणने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले असून, या पत्रात पथदिव्यांची मागील बाकी २ कोटी ७ लाख तर चालू थकबाकी पथदिव्यांची ५२ लाख रूपये असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पाणीपुरवठ्याची २० लाख रुपये अशी एकूण २ कोटी ७९ लाख रूपये थकबाकी असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात पालिकेला बिल भरण्याबाबत सूचना द्याव्यात, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकारी राजीव बुबणे यांच्याशी संपर्क साधला असता, वीज कंपनीची नोटीस आपणास मिळाली असून, पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने हा भरणा करता आला नाही. मात्र चार दिवसात पैशांची तरतूद करून बिलाचा भरणा करण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
२.७९ लाखांचे वीज बिल थकले
By admin | Updated: September 12, 2014 00:25 IST