राजेश खराडे , बीडजिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या विभागीय मंडळाचा कारभार गेल्या आठ वर्षापासून येथील प्रशिक्षण केंद्रातून चालविला जात आहे. विद्युत भवनाकरिता जागा असतानादेखील निधी अभावी आठ वर्षापासून नव्या इमारतीची मान्यता रखडली आहे. आहे ती इमारतही मोडकळीस आली असून कर्मचाऱ्यांना जीव मूठीत घेऊनच काम करावे लागत आहे. आठ वर्षापूर्वी नव्या इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत येथील विद्युत भवन तात्पूरत्या स्वरूपात प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्यात आले होते. इमारतीचे स्ट्रक्चर एका मजल्याचे असतानाही दोन मजले उभारण्यात आले आहे. शिवाय काळाच्या ओघात ही इमारत मोडकळीस आली आहे. ठिकठिकाणी इमारतीस गळती लागली असून वर्षभरापासून स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. अधीक्षक अभियंत्यासह कार्यकारी अभियंता व लघुप्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांचे कक्ष याच इमारतीमध्ये आहेत. शिवाय दररोज कामकाजाकरिता ग्राहकांची रेलचेल कायम सुरू असते. असे असतानाही येथील विद्युत भवनाची अवस्था एखाद्या उपकार्यकारी कार्यालयाप्रमाणे आहे. इमारतीला झाडाझुपांचा विळखा असून प्रशिक्षण केंद्रात जाताना कर्मचाऱ्यांना गळतीच्या थेंबापासून बचाव करावा लागत आहे. इमारतीचे बांधकाम जुने असल्याने सबंध इमारत एकीकडे झुकलेली आहे. जागेअभावी महावितरणचे निम्म्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय इमारतीमधून कारभार हाकावा लागत आहे.
प्रशिक्षण केंद्रातच उभारले विद्युत भवन
By admin | Updated: July 21, 2016 01:13 IST