परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक तब्बल १६ वर्षानंतर यावेळी गाजत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरूध्द पालकमंत्री पंकजा मुंडे अशी नात्यागोत्यातील थेट लढत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बहीण-भाऊ आमनेसामने आहेत. प्रचाराच्या धुराळ्याने तालुका ढवळून निघाला आहे.२६ एप्रिल रोजी होत असलेल्या या निवडणुकीत सुरूवातीपासूनच गरमागरमी आहे. आता दोन्ही गटाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे या तीन बहिणी किल्ला लढवित आहेत तर राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते पंडितराव मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे.दरम्यान, खा. प्रीतम मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली होती. त्यात प्रीतम यांच्या मदतीला धाकटी बहीण अॅड. यशश्री यांनी उडी घेतली आहे. दुसरीकडे पुत्र धनंजय यांच्यासाठी पंडितराव मुंडे हे सरसावले असून, त्यांनीही प्रचारात सहभाग घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक मुंडे विरूद्ध मुंडे अशी होत असून, नेतृत्वाची परीक्षा आहे.पंकजा मुंडे स्वत: उमेदवार आहेत मात्र, त्यांनी आतापर्यंत जाहीर वक्तव्य केलेले नाही. (वार्ताहर)
‘वैद्यनाथ’च्या निवडणुकीने तालुका निघाला ढवळून
By admin | Updated: April 20, 2015 00:33 IST