पूर्णा : पूर्णा येथील एका भूखंडाच्या वादावरून झालेल्या भांडणात पूर्णेतील दहा आरोपींना वेगवेगळ्या कलमाखाली पूर्णा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे़ याविषयी अधिक माहिती अशी की, पूर्णा येथील सर्वे नं़ १६ मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या प्लॉटचा वाद सुनील नारायण जैस्वाल व शेख खलील शेख अजीज यांच्यात होता़ न्यायालयात खटला सुरू असताना १२ मे २०१२ रोजी सुनील जैस्वाल व त्यांचा भाऊ अधीर जैस्वाल बांधकामावर पाणी टाकत असताना फिर्यादी शेख जुल्फेखार सोबत होते़ दरम्यान, यावेळी आरोपी अजजद अली, सुनील अग्रवाल, नासेर भाई, शेख खलील शेख अजीज व अन्य पाच लोक एकत्र आले व त्यांनी सुनील जैस्वाल व अधीर जैस्वाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ भांडण सोडविण्याकरीता फिर्यादी शेख जुल्फेखार कुरेशी व त्यांच्यासोबत महम्मद शरिफ बाबर कुरेशी यांनी मध्यस्थी केली असता, आरोपींनी त्यांना पण जबर मारहाण केली़ यामध्ये महम्मद शरिफ यांच्या छातीत मार लागल्याने जबर जखमी झाले होते़ त्यांना नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले़ या प्रकरणात फिर्यादी जुल्फेखार उर्फ बाबा कुरेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणात पोलिस निरीक्षक शंकर सिटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सी़जी़ मेहरकर यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते़ एक वर्षाचा कारावाससदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले़ या प्रकरणात कलम १४३ प्रमाणे सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड, कलम १४७ मध्ये एक वर्षाचा कारावास व एक हजार दंड तसेच कलम ३२३ व १४९ मध्ये एक वर्षाचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा पुर्णेचे न्यायाधीश ए़वाय़ घुले यांनी सुनावली़ सरकारी पक्षातर्फे अॅड़ डी़ एस़ नाटकर यांनी काम पाहिले़ या संपूर्ण शिक्षेमध्ये आरोपींना किमान एक वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे़ या प्रकरणामुळे जमीन हडप करण्याच्या प्रकारावर आळा बसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे़
दहा आरोपींना शिक्षा
By admin | Updated: June 29, 2014 00:26 IST