छत्रपती संभाजीनगर : असे अनेक लोक आहेत की, त्यांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाले, असे वाटतच नाही. रोज गरमागरम भात खाणाऱ्यांसाठी खुशखबर... नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून, यंदा मागील हंगामापेक्षा सुरुवातीलाच बासमतीसह अन्य तांदळाचे भाव कमी आहेत. मग, आता विचार करायचा नाही. पोट भरून भात खा...
कोणत्या राज्यातून आला नवीन तांदूळ?तांदूळ उत्पादक राज्य आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा येथील नवीन तांदळाची आवक जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती व जुन्या मोंढ्यात सुरू झाली आहे.
तांदळाचे भाव किती कमी ?मागील हंगामापेक्षा यंदा तांदळाचे भाव ५ ते १० टक्क्यांनी कमी झाले आहेत, कारण यंदा धानाचे उत्पादन समाधानकारक आहे. तसेच, बासमती व बिगर बासमती तांदळाची निर्यात कमी असून, निर्यातक मोठ्या ऑर्डरची प्रतीक्षा करीत आहेत.
आंध्र प्रदेशातून कोलम तांदूळआंध्र प्रदेशातून येणारा नवीन कोलम तांदूळ होलसेलमध्ये ५५०० रुपये आहे. मागील हंगामात या तांदळाची किंमत ६००० रुपयांपेक्षा अधिक होती. किरकोळ विक्रीत मागील हंगामात कोलम तांदूळ ७० ते ७२ रुपये किलो विकत होता. आता ६० ते ६२ रुपये आहे.
कर्नाटकातून आला सोनास्टिम तांदूळकर्नाटक राज्यातून आवक होत असलेल्या सोनास्टिम नवीन तांदळाचे भावही कमी झाले आहे. होलसेलमध्ये ४००० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. मागील वर्षी ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. किरकोळ विक्रीत २ रुपयांनी भाव कमी होऊन ४८ ते ५० रुपये किलो विकत आहे.
२ हजार रुपयांनी बासमती स्वस्तयंदा बासमती तांदळाचे उत्पादन उत्पादन चांगले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बासमतीला मागणी कमी आहे. निर्यात घटल्याने व उत्पादन जास्त असल्याने स्थानिक बाजारात बासमती तांदळाचे भाव २ हजार रुपयांनी कमी होऊन ८००० ते ९००० रुपये आहेत.
नवीन तांदूळ कधी खरेदी करावा ?येत्या ८ दिवसांत विदर्भातून कोलम, काली मूँछ, आंबेमोहर नवीन तांदळाची आवक सुरू होईल. वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांनी संक्रांतीनंतर सुरुवात करावी. कारण, तोपर्यंत ५० पेक्षा अधिक व्हरायटीचे तांदूळ बाजारात येतील. नवीन तांदळातील ओलसरपणा कमी झालेला असेल.- जगदीश भंडारी, घाऊक व्यापारी.
छत्रपती संभाजीनगरकरांची काली मूँछ, कोलमला पसंतीशहरामध्ये सर्वाधिक तांदूळ काली मूँछ व कोलम विकला जातो. काली मूँछ तांदूळ खाण्यास स्वादिष्ट, गोडसर, सुगंधीत असल्याने जास्त विकतो. हॉटेल, मेसकडून स्टिम कोलम व बासमतीला जास्त मागणी असते. कारण, स्टीम कोलम तांदूळ शिजल्यावर मोकळा भात होतो व दाणेही फुगल्याने तो जास्त वाटतो.- श्रीकांत खटोड, व्यापारी.