संजय तिपाले , बीडजिल्हा परिषदेत कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांवर दबावांचा ‘सिलसिला’ सुरुच आहे़ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एऩए़ इनामदार यांना बदलीचे ‘बक्षीस’ देण्यात आले़ आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हेंंच्या बदलीचा घाट घातला आहे़‘मिनीमंत्रालय’ म्हणून ओळख असलेली जिल्हा परिषद गेल्या काही वर्षांपासून सतत या ना त्या कारणावरुन चर्चेत आहे़ कधी बेकायदेशीर पदोन्नत्या, कधी विकासकामांतील घोटाळे तर कधी भरती प्रक्रियेत अनियमितता़ त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले़ यातून काही कर्मचाऱ्यांचे निलंबनही झाले आहे़ मात्र, अशाही परिस्थितीत काही अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवली़ प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला; परंतु या अधिकाऱ्यांना त्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली होऊन जावे लागले़ भामरेंनी पाजले होते घोटाळेबाजांना ‘पाणी’!ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी घोटाळेबहाद्दर अधिकारी- कर्मचारी व पाणी योजनांच्या समित्यांवर कारवाईचा बडगा उगारला़ आठ महिन्यात तब्बल २७ पाणी समित्यांवर ‘एफआयआर’ दाखल केले़ त्यामुळे पाण्यातून ‘लोणी’ काढणाऱ्यांच्या झोपा उडाल्या होत्या़ ते काही पदाधिकाऱ्यांना नको होते़ त्यामुळे त्यांची तीन महिन्यांपूर्वीच अमरावती येथे बदली झाली़ ही बदली देखील राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले जाते़‘त्यांनी’ इमानदारी सोडलीच नाही!सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एऩ ए़ इनामदार हे दुसरे उदाहरण़ नियमबाह्य ठराव प्रोसेडिंगमध्ये घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता़ इनामदारांनी मात्र ‘इमानदारी’ सोडलीच नाही़ त्यामुळे त्यांना सामान्य प्रशासन विभागातून महिला व बालकल्याण विभागात हलविण्यात आले़ नियमबाह्य कामांची कोल्हेंनी लावली चौकशी!अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे हे तिसरे अधिकारी सध्या राजकीय दबावाचा बळी ठरू पाहत आहेत़ जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्न (झेडपीआर) मधून मूळ तरतुदीपेक्षा चौपट कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे़ बांधकाम, लघुपाटबंधारे विभागातून नेमक्या किती कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली? कितीची देयके दिली? याची संबंधित विभागातच नोंद नाही़ डॉ़ कोल्हे यांनी बांधकाम, लेखा लघुपाटबंधारे या विभागांना पत्र पाठवून माहिती मागविली होती; परंतु तिन्ही विभागांनी हात वर केले़ काही पदाधिकाऱ्यांनी डॉ़ कोल्हेेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी जुमानले नाही़ शेवटी कालावधी शिल्लक असताना त्यांच्या बदलीचा घाट घातला जात आहे़ त्यांचा बीड येथील कार्यकाळ शिल्लक असताना बदलीसाठी काही पदाधिकारी जोरदार प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती आहे़ मात्र, तत्पूर्वीच डॉ़ कोल्हे दीर्घ रजेवर निघून गेले आहेत़सत्ताधाऱ्यांकडूनच दबाव ?जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते मदनराव चव्हाण म्हणाले, चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांनीच बळी घेतला आहे़ बेकायदेशीर कामांसाठी तेच अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, असा आरोपही त्यांनी केला़ चांगल्या अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनाच वावडे असून आम्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या सोबत आहोत असेही त्यांनी सांगितले़काय म्हणाले जि़प़ अध्यक्ष?जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी सांगितले, भामरे स्वत: बदली करुन गेले़ कोल्हेंची बदली अजून झालेली नाही़ ते स्वत:हून दीर्घरजेवर गेले आहेत़ सत्ताधाऱ्यांवरील आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला़जैस्वाल म्हणाले, नंतर बोलतो!यासंदर्भात विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी जरा बाहेर आहे़ याबाबत तुम्हाला मी नंतर बोलतो़
कर्तव्य कठोर अधिकाऱ्यांचे वावडे !
By admin | Updated: June 16, 2014 01:14 IST