जालना : दरेगाव परिसरात होत असलेल्या ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, दरेगाव स्थानकाचा विकास करण्याचे आश्वासन दिले. स्थानकाजवळ उड्डाणपूल उभारणीसाठी राज्य शासनाने पन्नास टक्के वाटा उचलल्यास रेल्वे प्रशासन अनुकूल असल्याचे मत दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी सोमवारी व्यक्त केले. जालना स्थानकाच्या वार्षिक तपासणीनंतर ते बोलत होते. स्थानक तपासणीसाठी गुप्ता यांच्यासह रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए.के.सिन्हा यांच्यासह जवळपास ४० अधिकारी उपस्थित होते. जालना स्थानकाचे नव्यानेच नूतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण स्थानकाची तपासणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महाव्यवस्थापकांची तपासणी नावालाच ठरली. स्थानकातील काही ठिकाणी त्यांनी केवळ कटाक्ष टाकला. कोणतीही विचारणा केली नाही वा त्रुटीही काढली नाही, हे विशेष! रेल्वेने बांधलेल्या कम्युनिटी हॉलचे लोकार्पण गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, जालन्यापासून जवळच असलेल्या ड्रायपोर्टसाठी जालना ते मनमाड दुहेरी रेल्वेमार्ग करावा, अशी मागणी उद्योजकांच्या वतीने अर्जुन गेही आदींनी केली. यावेळी ड्रायपोर्टसाठी दरेगाव स्थानकाचा विकास करण्यासाठी तसेच अतिरिक्त रेल्वे लाईन अंथरण्यासाठी कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया तसेच जेएनपीटीसोबत चर्चा करावी लागेल, असे गुप्ता म्हणाले. काही संघटनांनी उड्डाण पुलाअभावी कशी गैरसोय होत आहे, याबाबतचे निवेदन सादर केले. यावर त्यांनी सकारात्मकतेचे आश्वासन दिले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी गुप्ता यांना निवेदन देऊन स्थानकातील मूलभूत समस्या तसेच वाढीव गाड्यांसंदर्भात चर्चा केली. तत्पूर्वी कम्युनिटी हॉल परिसरात गुप्ता यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सिन्हा यांची वकिलीमहाव्यवस्थापक गुप्ता यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए.के. सिन्हा हेच देत होते. उड्डाणपूल, स्थानकातील पाणी समस्या, झाडांना पाणी देण्याबाबतचा निर्णय तसेच इतर अनेक मुद्यांवर विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे सिन्हा हेच देत होते. थोडक्यात सिन्हा हेच गुप्ता यांची वकिली करत असल्याचे चित्र होते. गुप्ता हे पुन्हा रेल्वेत बसल्यावर सिन्हा यांनीच पत्रकारांसोबतच वार्तालाप केला.
उड्डाणपुलासाठी ‘दमरे’ सकारात्मक..!
By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST