मोहन बोराडे, सेलू शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या शहरात अद्यावत क्रीडा संकुल उभारणीचे काम सुरु झाले. मात्र जागेचा प्रश्न उद्भवल्यामुळे क्रीडा संकुलाचे काम रखडत पडले आहे. शासनाने तालुकास्तरावर अद्यावत क्रीडा संकुल उभारणीसाठी पुढाकार घेतला. सेलू शहरात क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलनाची नितांत गरज होती. त्यानंतर क्रीडा संकुलनाचे काम सुरुही झाले. परंतु, जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे संबंधित विभागाने नवीन जागा शोधण्याचे काम सुरु केले आहे. क्रीडा संकुल उभारणीसाठी नूतन संस्थेने महाविद्यलयासमोरील जागा उपलब्ध करुन दिली होती. त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे कामही सुरु झाले होते. त्यात व्हॉलिबॉल, बास्केटबॉल कोर्ट, खो-खो, कबड्डी आदी खेळाचे मैदान तयार झाले. त्यावर ८ लाख २७ हजार रुपये खर्चही झाला. परंतु, जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट झाल्यामुळे हे काम रेंगाळले. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने शहरातील दोन ठिकाणी जागा पाहणी केली. त्यातील नगरपालिकेचे स्टेडियम ही जागा संयुक्तिक वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. क्रीडा संकुल उभारणीसाठी ५५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जवळपास ४६ लाख रुपयांचा निधी पडून आहे. शहराने आंतराष्ट्रीय पातळीवर खेळाडू दिले आहेत. राज्य, राष्ट्रीयस्तरावर सेलूतील खेळाडूंनी मैदान गाजविलेले आहे. क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुल उभारणी अत्यंत आवश्यक आहे. सध्या मैदान अपुरे पडत असल्यामुळे क्रीडाप्रेमींची कुचंबना होते. त्यामुळे क्रीडा संकुल तत्काळ व्हावे, ही अपेक्षा खेळाडू बाळगून आहेत.
सेलूतील क्रीडा संकुल उभारणीला जागेचा खोडा
By admin | Updated: May 28, 2014 00:38 IST