उमरगा : तालुक्यातील डिग्गी आणि बेडगा या गावात बुधवारी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या दोन्ही गावातील जवळपास ७० विजेचे खांब उन्मळून पडल्याने या गावात पिण्याच्या पाण्याचा व दळण कांडपाचा प्रश्न गंभीर झाला आहे.बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह डिग्गी, बेडगा गाव शिवारात अवकाळी पावसाने झोडपायला सुरुवात केली. या अवकाळी पावसात वादळी वाऱ्याचा मोठा वेग असल्याने बेडगा येथील पंचाक्षरी स्वामी, रावसाहेब माने, भानुदास गावडे, धोंडीराम माने, परमेश्वर पाटील, केरबा भालेराव, सोपान कांबळे, भारत माने आदींसह ४० ग्रामस्थांच्या घरावरील व जनावरांच्या गोठ्यावरीलही पत्रे उडून गेले. डिग्गी येथे वादळ वाऱ्याने किरण रावळे, महावीर इंदूकांदे, बाबू एकंबे, आण्णाप्पा एकंबे, सुभाष एकंबे, गुलाब शेख, मल्लिनाथ पाटील आदींसह ३० ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून गेले.वादळी वाऱ्यामुळे बेडगा येथील जि.प. शाळेवरील सर्र्व पत्रे उडून गेले असून, खांब उन्मळून पडले आहेत. या घटनेत या दोन्ही गावातील ७० विजेचे खांब, शिवारा-शिवारातील ७० ते ८० झाडे उन्मळून पडली आहेत. सायंकाळी उशिरा ही घटना घडल्याने या दोन्ही गावातील ग्रामस्थ व शेतकरी आपल्या घरावरील पत्र्यांचा शोध घेत उशिरापर्यंत फिरत होते. विजेचे खांब उन्मळून पडल्याने या दोन्ही गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने या गावातील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (वार्ताहर)
डीग्गी, बेडगा गावांना वादळी वाऱ्याचा जबर तडाखा
By admin | Updated: May 5, 2016 00:35 IST