प्रदीपकुमार कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : लोहा- नांदेड रस्त्यावर पार्डीपासून दक्षिणेला ३ कि़ मी़ अंतरावर असलेल्या पिंपळगाव ढगे या गावाचा कायापालट जलयुक्त शिवार योजनेमुळे झाला आहे़ या परिसरात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली आली असून हे गाव टंचाईमुक्त झाले आहे़ राज्य शासनाचा जलयुक्त शिवार हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविला जात आहे़ लोहा तालुक्यातील कृषी विभागाने पिंपळगाव ढगे या गावात तीन बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट घेतले होते़ त्यापैकी १६ मे २०१७ रोजी दोन बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून तीसऱ्या बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे़ बंधारा क्रमांक १ मध्ये सध्या ९़२८ टीसीएम तर बंधारा क्रमांक ३ मध्ये १०़६ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध आहे़ तीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावात पूर्वी घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत होती़ कोरड्या पडलेल्या विहिरीत डबक्याने पाणी काढले जायचे़ या भागातील विहिरींना पाणी नसल्याने पिकांना पाणी मिळत नव्हते़ अशा दुष्काळाचे जगणे वाट्याला आलेल्या ग्रामस्थांचे जलयुक्त शिवार योजनेमुळे जगणे सुकर झाले़ग्रामपंचायत व कृषी विभागाने बांधलेल्या या बंधाऱ्यांत सध्या मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने या भागातील पाणीपातळी उंचावली आहे़ तर तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे़ उन्हाळ्यातही विहिरींना व बोअरची पाणीपातळी वाढली़ त्यामुळे बारा महिने टँकरने पाणीपुरवठा होणारे पिंपळगाव ढगे जलयुक्त शिवार योजनेमुळे टंचाईमुक्त झाले आहेत़ तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे, सरपंच अनिता वाघमारे, उपसरंपच अमोल पाटील ढगे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला़ पिंपळगाव ढगे या गावाची आदर्श गाव म्हणून वाटचाल होत आहे़
जलयुक्त शिवारमुळे पिंपळगाव बनले सुजलाम्, सुफलाम्
By admin | Updated: July 8, 2017 00:28 IST