परसोडा : मोठा गाजावाजा करीत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रेल्वेलाइनच्या दुतर्फा आणि करंजगाव, परसोडा, खंडाळा या रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या लाखो झाडे लावली होती. परंतु झाडे लावून मोकळ्या झालेल्या सामाजिक वनीकरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. ना पाणी मिळाले ना त्याची निगराणी झाली. परिणामी जवळपास ऐंशी टक्के झाडे वाळून गेली आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे.
वनविभागाच्या वतीने पाच वर्षात राज्यभरात ५० लाख वृक्षलागवड करण्यात आली. त्याअंतर्गत गेल्या वर्षी लासूर स्टेशन ते रोटेगाव या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा लाखो झाडांची लागवड करण्यात आली. परंतु त्याची वेळेवर योग्य पद्धतीने देखभाल न झाल्याने अक्षरश: वाढलेली झाडे जळून गेली आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी या लावलेल्या झाडांची निगा राखली आहे. ती झाडे मात्र दहा फुटाच्या उंचीपर्यंत गेले आहे. शासन कोणत्याही चांगल्या उपक्रमासाठी लाखो रुपये खर्च करते. परंतु काही ठिकाणी झालेल्या हलगर्जीपणामुळे झाडांची परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे. वृक्षांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचा दावा वनविभागाकडून केला जात आहे. परंतु वनविभागाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, वृक्षांना वाचविण्यासाठी पर्यावरण व वृक्षप्रेंमींची देखील मदत घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.