लातूर : लातूर शहरातील दलित वस्त्यांतील ९८ कामांना प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा असून, गेल्या वर्षभरापासून मान्यतेअभावी कामांंना प्रारंभ नाही. त्यामुळे ८ कोटींचा निधी पडून आहे. सर्वसाधारण सभेत या कामांसाठी मंजुरी मिळाली. मात्र प्रशासकीय मान्यता नसल्याने कामे रखडली आहेत. नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत १६ जून २०१५ रोजी राज्य शासनाकडून लातूर मनपाला २ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानंतर याच योजनेत दलित वस्त्यांच्या विकासासाठी ६ कोटींचा निधी राज्य शासनाकडून मनपाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार मनपाने १ फेब्रुवारी २०१३ रोजीच्या सर्वसाधारण सभेत दलित वस्त्यांच्या विकासासाठी ठराव घेतला. तर ६ कोटींच्या निधीतून कामे करण्यासाठी २३ आॅक्टोबर २०१५ च्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित केला. दोन कोटींतून २२ कामांना सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. तर ६ कोटींतून ७६ कामांना सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. मात्र प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २२ जानेवारी २०१६ पासून प्रशासकीय मान्यतेसाठी ही कामे प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळते. परंतु, मनपा प्रशासनाकडून त्यासाठी पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे एकूण दलित वस्ती सुधार योजनेचे ९८ कामे रखडली आहेत. निधी असून ही कामे रखडली आहेत. या ९८ कामांमध्ये नांदगाव वेस ड्रेनेज लाईन, वॉर्डात सीएफएल बसविणे, सभागृह बांधणे, अंतर्गत सिमेंट काँक्रिटचे रस्ते, हायमास्ट बसविणे, अंडर ग्राऊंड ड्रेनेज व पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश आहे. दलित वस्तीनिहाय कामांबाबतचा ठराव मनपाने घेतला आहे. मात्र प्रशासकीय मान्यतेसाठी मनपाची उदासिनता आहे. (प्रतिनिधी)विविध विकास कामांसाठी मनपाला तेराव्या वित्त आयोगात २७ मार्च २०१५ रोजी १ कोटी १६ लाख २८ हजार ६४५, तेराव्या वित्त आयोगातच २५ एप्रिल २०१५ रोजी १ कोटी ३४ लाख ८३ हजार ६६४, याच योजनेत याच तारखेत २ कोटी ७५ लाख ९१ हजार ५०१ तसेच नागरी दलित वस्ती सुधार योजनेत २ कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेत ३ कोटी ५९ लाख ६ हजार, नागरी दलितेत्तर योजनेत ७३ लाख ४३ हजार, दलितवस्ती सुधार योजनेत ६ कोटी, १४ व्या वित्त आयोगात १० कोटी ४५ लाख २४ हजार ३७७, १४ व्या वित्त आयोगात १२ लाख ४२ हजार ८३८ असा निधी प्राप्त झाला आहे. मात्र यातील दलितवस्ती योजनेतील निधी प्रशासकीय मान्यतेअभावी पडून आहे.
प्रशासकीय मान्यतेअभावी दलित वस्तीतील ९८ कामे ठप्प
By admin | Updated: September 1, 2016 01:16 IST