लातूर : बुलढाणा शहरातील ज्योत्स्ना नागरे या विवाहितेचे पती आणि त्याच्या नातेवाईकाने शुक्रवारी एमआयडीसी परिसरातून दिवसाढवळ्या अपहरण केले होते़ या अपहरणनाट्यानंतर पोलीस आपला पाठलाग करीत आहेत़ या प्रकरणात आपल्याला अटक करतील या भीतीपोटी अपहरणकर्त्यांनी ज्योत्स्ना नागरे या विवाहितेची सुटका केली आणि रविवारी रात्री उशिरा ज्योत्स्ना आपल्या बुलढाणा येथील घरी परतल्या़ या घटनेनंतर आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले असून, त्यांचा पोलीस पथकाकडून शोध सुरू आहे़ बुलढाणा शहराच्या चिखली रोड येथील ज्योत्स्ना नागरे (३०) या विवाहितेचे पती व त्याच्या नातेवाईकाने शुक्रवारी लातूर येथील एमआयडीसी परिसरातून एका कारमधून अपहरण केले होते़ गेल्या तीन दिवसांपासून अपहरणकर्त्याच्या मागावर एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होते़ दरम्यान, आरोपीचे लोकेशन हे मध्य प्रदेशातील खांडवा परिसरात दाखविण्यात आले़ त्यानुसार आरोपीचा पाठलाग या दोन्ही पथकाने केला़ पोलीस आपला पाठलाग करीत आहेत, असे जाणवल्यानंतर आरोपी मोहम्मद अब्दुल जावेद वहाब व त्याच्या नातेवाईकाने अपहृत विवाहितेची रविवारी रात्री उशिरा सुटका केली़ त्यानंतर विवाहितेने बुलढाणा येथील आपले घर गाठले़ त्यानंतर आरोपी फरार झाले़ पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत़
अटकेच्या भीतीने पतीने केली ‘त्या’ विवाहितेची सुटका
By admin | Updated: January 23, 2017 23:32 IST