मोबीन खान , वैजापूरशहरातील काही खाजगी डॉक्टरांनी सिझेरियन प्रसूतीचा गोरखधंदा सुरू केला आहे. खाजगी दवाखान्यात एकूण प्रसूतींपैकी तब्बल ७० टक्के सिझेरियन करण्यात येत असल्याचे भयावह सत्य समोर आले आहेखाजगी दवाखान्यांमध्ये सिझेरियनसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने डॉक्टरांकडून गरोदर महिला व तिच्या नातेवाईकांना काही ठराविक कारणे सांगून पैसा उकळण्याचे प्रकार घडत आहेत. बाळ बाहेर येत नाही, गरोदर मातेला कळा येत नाहीत, गर्भात पाणी कमी आहे, बाळ व्यवस्थित फिरत नाही, गर्भाचे ठोके बरोबर येत नाहीत असे सांगून नातेवाईकांना भावुक करून गरोदर मातेला सिझेरियनसाठी तयार केले जाते. नॉर्मल प्रसूती झाली तर २ ते ३ हजार रुपये खर्च येतो; मात्र सिझेरियन प्रसूती झाली तर २० ते २५ हजार रुपये खर्च लागतो. शहरातील बहुतेक आयुर्वेदिक व होमिओपॅथिक दवाखान्यात प्रसूतिगृहाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांना नॉर्मल अथवा सिझेरियन प्रसूती करण्याची परवानगी कोणी दिली, हे न उलगडणारे कोडे आहे.गरोदर महिलेच्या प्रसूतीमध्ये शासकीय रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण १० टक्के आहे, तर खाजगी दवाखान्यात हेच प्रमाण ७० टक्क्यांवर असल्याचे दिसून आले आहे. शहरात २० खाजगी व दोन शासकीय रुग्णालये आहेत. आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१५ या सहा महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात १ हजार ३५७ गरोदर महिलांची प्रसूती झाली. खाजगी २० दवाखान्यांत झालेल्या प्रसूतीमध्ये ७० टक्क्यांवर महिलांची सिझेरियन प्रसूती झाली.येथील उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषदेच्या भगवान महावीर रुग्णालयात झालेल्या रुग्णालयात ९० टक्के प्रसूती ही नॉर्मल, तर १० टक्केच सिझेरियन प्रसूती करण्यात आल्या.
वैजापुरात प्रसूतीचा गोरखधंदा तेजीत
By admin | Updated: April 21, 2015 00:54 IST