चारठाणा : वीजपुरवठा करणाऱ्या कालबाह्य उपकरणामुळे चारठाणा व परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. लोखंडी खांबावर गंज लागल्याने व सिमेंटचे खांब फुटल्याने ते कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे. जवळपास ४०-४५ वर्षांपासून वीजतारा बदललेल्या नाहीत. त्यामुळे शेकडो ठिकाणी तारांना जोड दिले जातात. या तारा एकमेकांना चिटकू नये, म्हणून त्यावर दगड बांधलेले आहेत. त्यामुळे हाताला लागतील एवढ्या खाली तारा लटकलेल्या असतात. तारा जमिनीवर पडून अनेकवेळा दुर्घटनाही घडल्या आहेत. एकाच महिन्यात तीन वेळा एकाच रोहित्रास आग लागली होती. तरीही त्याची तात्पुरती डागडुजी करून पुन्हा पुन्हा जनतेच्या जीवितास धोका निर्माण केला जात आहे. काही वर्षांपूर्वी गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती याचेच बळी ठरले होते. विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारा तुटून कडबा व घरे जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटनाही घडली होती. याविषयी नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने दिली. परंतु फरक पडला नाही. यापूर्वी गावात अनेक वीज अपघात झाले तरी परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच बिकट होत आहे. कालबाह्य व जीवघेण्या वीज तारा, जीर्ण अवस्थेतील खांब, विद्युत उपकरणे यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. तशी यापुढे होऊ नये म्हणून तालुका दंडाधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चारठाणा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)
कालबाह्यझालेल्या उपकरणामुळे चारठाणकरांचा जीव धोक्यात
By admin | Updated: September 13, 2014 23:05 IST