इरफान सिद्दीकी, हट्टा तब्बल २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे नळयोजना बंद असल्याने हट्टा येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी शासनाने ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, या उदात्त हेतूने वाडी (सु.) येथील पूर्णा नदीशेजारी विहीर बांधली. तेथून हट्टा येथील जलकुंभापर्यंत पाईपलाईन टाकून पाणी आणण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्या निकृष्ट दर्जाच्या पाईपला अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाणी काही जलकुंभापर्यंत पोहोचलेच नाही. दरम्यान, शासनाने पूर्वीची नळयोजना बंद केल्यानंतर गावातील बोअरवरून पुन्हा निधी देऊन सर्व पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु त्याही पाईपलाईनला गळती लागल्याने पाणी जलकुंभापर्यंत पोहोचले नाही. २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या जलकुंभावरील लोखंडी कठडे गायब झाले असून, लाखो रुपये खर्चून नळाला पाणी आले नाही. पाण्यासाठी बांधलेल्या तोट्या आता गायब झाल्या आहेत. गतवर्षी शासनातर्फे नळयोजनेसाठी सर्वे करण्यात आला. नवीन नळयोजनेसाठी ग्रामपंचायतीच्या पाठीमागील जागेत विहीर बांधून तेथून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम होणार असल्याची चर्चा झाली. संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी सर्वे केला; परंतु या नवीन नळयोजनेच्या सर्वेचे काय झाले? हे मात्र ग्रामस्थांना कळाले नाही. लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी २५ वर्षांपासून बंद पडलेल्या नळयोजनेकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांना दरवर्षी भटकंती करावी लागत आहे.
पंचवीस वर्षांपासून नळयोजना बंद पडल्याने ग्रामस्थांचे हाल
By admin | Updated: May 14, 2014 01:02 IST