पाटोदा/शिरूरकासार : येथील तहसीलमधील काही कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे रेंगाळली असून कर्मचारी कामावर नसल्याने तहसील सुनसान असल्याचे बुधवारी दिसून आले. पाटोदा व शिरूर तहसीलमधील महसूल कर्मचारी संघटनेने १ आॅगस्टपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पदोन्नतीने झालेले नायब तहसीलदार, लिपीक, अव्वल कारकून, कोतवाल, वाहनचालक, शिपाई आदींनी या संपात सहभाग घेतला आहे. नायब तहसीलदारांची सर्व पदे पदोन्नतीने भरावीत, चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शिपायांना पदोन्नतीने तलाठी पदी नियुक्ती द्यावी, नायब तहसीलदारांचे ग्रेड पे वाढवावा, आदी मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संपामुळे कामे रेंगाळली आहेत. येथे जात प्रमाणपत्रासह नॉन क्रिमिलेअर काढण्यासाठी विद्यार्थी दररोज खेटे घालित आहेत. यासह विविध कामे रेंगाळल्याने सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने तहसीलही सुने झाले आहे. (वार्ताहर)
आंदोलनामुळे तहसील सुनसान
By admin | Updated: August 7, 2014 01:46 IST