सेलू : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सेलू तालुक्यात दुष्काळ- सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी महापूर, अतिवृष्टी व गारपिटीने शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामात अपेक्षित उत्पादन घेता आले नाही. यावर्षी शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली मात्र वेळेवर पाऊस न झाल्याने ही पेरणी वाया गेली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना महागडी बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागली. मागील आठवड्यात काही प्रमाणात पाऊस झाला त्यावर पेरणी झाली मात्र त्यानंतर पाऊस उघडल्याने कोवळी पिके धोक्यात आली आहेत. दोन ते तीन दिवसांपासून कडक उन्हाचे चटके बसत असल्यामुळे कापूस व सोयाबीनची पाने सुकत आहेत. तर पावसाअभावी जमिनीत ओल नाही. त्यामुळे कोवळी पिके किती काळ तग धरणार? हा प्रश्न आहे.२६ जुलैपर्यंत सेलू तालुक्यात केवळ ११३.८० मि.मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी याच महिन्यापर्यंत ४६०.२० मि.मी. पाऊस झाला होता. ही तफावत लक्षात घेता यावर्षी अत्यंत भयवह परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. प्रमुख नदी-नाल्या अद्यापही कोरड्या आहेत. पाणीपातळीत अद्याप वाढ झालेली नाही. ठिबकवर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. परंतु गुगळी धामणगाव शिवारात एका कंपनीच्या बियाणाचा कापूस लाल व सुकू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली. दरम्यान, दोन ते तीन दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामात धोक्यात येणार आहे. (प्रतिनिधी) दुधनाच्या पाणीपातळीत वाढ नाहीनिम्नदुधना प्रकल्पातही पावसाअभावी वाढ झालेली नाही. प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा आहे. परंतु काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुधना काठावरील गावांना पाणीटंचाई भासू शकते. जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर निम्न दुधना प्रकल्पात वेगाने पाणीसाठा होतो. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा होता. शहर व अनेक गावांना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो त्यामुळे १० ते १५ टक्के पाणी काही महिन्यातच प्रकल्पातून कमी झाले आहे.
सेलू तालुक्यावर दुष्काळाची छाया
By admin | Updated: July 27, 2014 01:09 IST