औरंगाबाद : तब्बल महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील किमान २ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल, अशी माहिती जि. प. कृषी विभागाच्या सूत्राने दिली. चार-पाच वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच मृगाचा चांगला पाऊस झाल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांनी मागचा- पुढचा विचार न करता तब्बल ८०-९० टक्के पेरण्या उरकल्या. पुढे काही दिवसांतच पावसाने आड धरली ती आजपर्यंत. आणखी ३० तारखेपर्यंत अशीच स्थिती राहिली, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल. मृगाच्या पावसाने सुखावलेल्या शेतकऱ्यांनी आणखी पुढे पाऊस पडेल, या आशेवर कापूस, मका, सोयाबीन, संकरित ज्वारी, तूर, उडीद, मूग आदी पिकांच्या पेरण्या उरकून घेतल्या. पिकेही चांगल्या प्रमाणात उगवून आली होती; मात्र नंतर पावसाने दडी मारल्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून वारा सुटल्यामुळे ढग गायब होत आहेत. या स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठांमध्ये उत्साह नाही. सर्व व्यवहार मंदावले आहेत.
२ लाख हेक्टरवर दुष्काळी छाया
By admin | Updated: July 21, 2015 00:20 IST