छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बॉटनिकल गार्डनमध्ये चारचाकी (एमएच २८ एएफ ३००६) शिरल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या वाहनात चार महिला, दोन मुले आणि दोन पुरुष होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी दिली.
बेगमपुरा पोलिसांसह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील वाय पॉईंट येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याने सचिन आसाराम गंगावणे यांचे कुटुंब अलिशान चारचाकीतून जात होते. यातील आठ जण लेणी परिसरात आयोजित वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पुतळ्यापासूनचे वळण घेतल्यानंतर चालकाला मोबाईलवर फोन आला. हा फोन घेण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या गट्टूवर गाडी आदळली. तेव्हा चालक गोंधळला आणि त्याने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर जोरात दाबले.
त्यामुळे गाडीने अचानक वेग घेतला. तीनचार गट्टू तोडून गाडी गार्डनमध्ये घुसली. कंपाऊंडच्या तारा तोडून आत शिरल्यानंतर अशाेकाच्या झाडावर आदळली. त्यात गाडीच्या एका बाजूचे दोन टायर फुटले. त्याशिवाय इतरही नुकसान झाले. मात्र, सुदैवाने गाडीतील आठही जणांना विद्यापीठाचे सुरक्षारक्षक किशोर शेजूळ, राजेंद्र गायके यांनी सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच बेगमपुरा पोलिसांसह मुख्य सुरक्षारक्षक बाळासाहेब इंगळे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गाडी टाेईंग करून बाहेर काढण्यात आल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली.