लातूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. १४ ते १९ मार्चदरम्यान दीड हजारांवर आक्षेप नोंदविले गेले असून, मतदारांचा प्रभाग बदलल्याच्या बहुतांश तक्रारी आहेत, तर काही मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी आहेत. २० मार्चपर्यंत आक्षेप घेतले जाणार असून, २२ मार्चपर्यंत त्यावर निर्णय दिला जाणार आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर मनपाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाले. या यादीवर मतदारांचे आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यानुसार १४ मार्चपासून दररोज आॅनलाईन पद्धतीने आक्षेप आले आहेत. आतापर्यंत आॅनलाईन पद्धतीने १ हजार ५१६ आक्षेप नोंदविले गेले आहेत. तर लेखी पद्धतीने केवळ २१ आक्षेप आले आहेत. मनपातील ३५ ते ४० कर्मचारी आलेले आक्षेप नोंदवून घेण्याचे काम करीत आहेत. मतदारांनी नोंदविलेल्या आक्षेपानुसार प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादीतील संबंधितांचे नाव तपासले जात आहे. यापूर्वी कुठल्या प्रभागात होते आणि आता कुठल्या प्रभागात आले आहेत, याची खातरजमा या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत नाव होते, परंतु आता मनपाच्या प्रारुप मतदारयादीत नाव नाही. अशा २५ ते ३५ तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. तर दीड हजारांपैकी बहुतांश तक्रारी प्रभाग बदलल्याच्याच आहेत. मनपात लेखी पद्धतीने तसेच आॅनलाईन पद्धतीने, शिवाय झोन कार्यालयातही आक्षेप घेण्यात येत आहेत. सोमवारी २० मार्च रोजी आक्षेप नोंदविण्याची शेवटची तारीख आहे. अखेरच्या तारखेत आक्षेपांचा पाऊसच पडत असल्याचे चित्र आहे. बहुप्रभाग रचना असल्यामुळे मोठे प्रभाग आहेत. त्यामुळे अनेक मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात गेली असल्याचे आक्षेपांवरून दिसत आहे. १४ ते १९ मार्च दरम्यान या सहा दिवसांच्या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने १ हजार ५१६ जणांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्यावर मनपाचे कर्मचारी प्रत्यक्ष प्रभागांत जाऊन खात्री करून संबंधितांचे नाव प्रभाग बदलून घेतले जात असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारचा शेवटचा दिवस आक्षेप नोंदविण्याचा आहे.(प्रतिनिधी)
प्रारूप मतदार यादीवर आक्षेपांचा पाऊस
By admin | Updated: March 19, 2017 23:26 IST