जालना : शहरातील विविध बँकांमध्ये सोमवारी सर्व्हर डाऊनमुळे बँकिंग सेवा कोलमडली होती. खाजगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये व्यवहार करताना ग्राहकांची गैरसोय झाली. या सर्व्हर डाऊनच्या फटक्यांमुळे लाखो रुपयांचे व्यवहार रखडले होते.इंटरनेटमुळे सर्वच बँका आॅनलाईन जोडलेल्या आहेत. व्यवहारही आॅनलाईन आहेत. यामुळे पैसे काढण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंतच्या व्यवहारांना सोमवारी बराच वेळ लागत होता. बँकांमधून सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आले. याचा परिणाम दिवसभर दिसून आला. बँक व्यवहारासाठी आलेले व्यावसायिक, शेतकरी, निवृत्तीवेतनधारक, विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला.शहरात ४० पेक्षा अधिक बँका आहेत. चलन भरणे, धनादेश पाठविणे, धनाकर्ष पाठविणे, काढणे, मनी ट्रान्सफर आदी कामे थांबल्याचे दिसून आले. सर्व्हर डाऊनमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. बीएसएनएलने इंटरनेट सेवा सुधारावी, अशी अपेक्षा अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. बहुतांश सर्व्हर बीएसएनएल इंटरनेट माध्यमातून सुरू असल्याने बँक अधिकारी व कर्मचारीही त्रस्त झाल्याचे दिसून आले. ग्राहकांना उत्तरे देऊन बँक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. काही ठिकाणी पतसंस्थांच्या व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
सर्व्हर डाऊन,बँंक सेवा ठप्प
By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST