औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा दरवाजा सर्वसामान्य वाहनधारकांसाठी बंद झाला होता. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत होती; परंतु या पदावर नुकतेच रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कक्षाचा दरवाजा वाहनधारकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे वाहनांसंबंधी येणाऱ्या अडचणी मांडणे वाहनधारकांना शक्य होत आहे. आरटीओ कार्यालयात दीड वर्षापूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर सावंत रुजू झाले. त्यामुळे कार्यालयातील कामकाजाची गती वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु सावंत यांनी वाहनधारकांना किंवा कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींना भेटणेच बंद केले. त्यांनी आपल्या कक्षाचा दरवाजाच बंद केला. त्यामुळे विविध कामांसाठी त्यांना कुणीही भेटू शकत नव्हते. अशा परिस्थितीमुळे त्यांच्यात आणि वाहनधारकांत वारंवार खटके उडत होते. सावंत यांच्याकडे प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कक्षाचा दरवाजा वाहनधारकांसाठी बंद झाला. काही दिवसांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. या पदावर अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पदभार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कक्षाचा दरवाजा वाहनधारकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर पूर्वीप्रमाणे हा दरवाजा खुला झाला आहे. वाहनधारकांनी भेटण्यासाठी त्यांनी वेळही निश्चित करून दिली आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी दिली.
अनेक महिन्यांनी उघडला दरवाजा
By admin | Updated: July 29, 2016 01:09 IST