बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथे मागील दहा-बारा दिवसांपासून डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले असून, याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रसिध्द करताच आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली असून, शनिवारी आरोग्य विभागाचे एक पथक गावात दाखल झाले आहे. या पथकाने ग्रामपंचायतीला स्वच्छतेबाबत काही सूचना करून घरोघरी अॅबेटींगही केले. बलसूर येथील एका २५ वर्षीय महिलेचा १७ सप्टेंबर रोजी डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला होता. याही महिलेला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, यानंतर आणखी एका चार वर्षीय मुलीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असे असताना आरोग्य विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने या गावाला अद्याप भेट दिलेली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. ए. सुरवसे, येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एन. जोशी तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गिरीष कडगंचे यांचे पथक शनिवारी सकाळीच बलसूर गावात दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी गावातील कायमस्वरूपी डास उत्पत्ती असणारी ठिकाणी नष्ट करणे, तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे, आडगळीच्या वस्तू, टायर आदींची विल्हेवाट लावणे, कोरडा दिवस पाळणे आदींबाबत ग्रामपंचायतीला सूचना केल्या. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन अॅबेटींगही करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विठ्ठल कांबळे, माधव कांबळे, मनोहर पाटील आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
डॉक्टरांचे पथक बलसूरमध्ये दाखल
By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST