संजय तिपाले बीडकायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’चा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे घरफोड्या, दरोडे, वाटमाऱ्या व मंगळसूत्र चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. तपास रखडलेलेच असून पोलीस यंत्रणा हतबल असल्याचे चित्र आहे. लूटमारीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे ‘आॅल आऊट’ कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यात २८ चोऱ्या, १० घरफोड्या, एक वाटमारी, चेनचोरी व दरोड्याचे प्रत्येकी दोन गुन्हे घडल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. दिवसा घरफोड्या, लूटमार करुन गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर व गंगावाडी येथे शेतवस्त्यांवर धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी मारहाण करुन ऐवज पळविला. पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात दीपक टवाणी या व्यापाऱ्याला वाहन अडवून पिस्तूलच्या धाकावर तीन लाखास लुटले. बीडमध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत सलग दोन दिवस गंठनचोरीच्या घटना घडल्या. तपासासाठी अधीक्षक जी. श्रीधर यांनी पथके नेमली; परंतु ती रिकाम्या हाती परतली आहेत. अधीक्षकपदी रूजू झाल्यापासून जी. श्रीधर यांनी ‘आॅल आऊट आॅपरेशन’ ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून अचानक संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरवून वाहनांची तपासणी केली जाते. शिवाय गुन्हेगारांचीही झाडाझडती घेतली जाते. या माध्यमातून कायदा- सुव्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, गंभीर गुन्ह्यांच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नसून, चोर, दरोडेखोर मोकाट आहेत. लागोपाठ होणाऱ्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्य धास्तावले आहेत.
दरोडे, वाटमाऱ्यांचे ‘आॅल आऊट’ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 23:49 IST