उन्हाळ्यात गौताळा, पाटणादेवी, अजिंठा, सारोळा, म्हैसमाळ, सोयगाव, सातारा, देवळाई डोंगर, विद्यापीठाच्या मागचा डोंगर या भागात आगी लागत असतात. या आगी ९५ टक्के वेळा मानव निर्मित असतात, असा दावा औरंगाबादचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ.किशोर पाठक यांनी केला आहे.
दहा वेळा आगी
मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल म्हणून ख्याती असलेल्या गौताळा-पाटणादेवी अभयारण्यात मागील दोन महिन्यांत छोट्या-मोठ्या दहा वेळा आगी लागल्या. या आगीत अनेक वृक्ष, झुडुपे, वनस्पती, कीटक, सस्तन प्राणी, पक्षी हे जखमी होतात, मृत पावतात. एक मोठी जैवविविधता या आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असते. उन्हाळा सुरू झाला की, जंगल परिसराच्या आसपासचे शिकारी, निसर्ग कंटक लोक मुद्दाम या आगी लावत असतात. या आगी लावण्याचे कारण म्हणजे फुकटचे लाकूड मिळविणे, जंगल विभागात शेतीसाठी अतिक्रमण करणे, मोर, तितर, घोरपड, ससे, रानडुकर व इतर सस्तन प्राण्यांच्या शिकारीसाठी आग लावली जाते, असे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
विद्यापीठ परिसरातील डोंगर भागात, तसेच म्हैसमाळ, देवळाई, सातारा डोंगर रांगेत आतापर्यंत मागील चार महिन्यांत सात वेळा आगी लावल्या गेल्या. निसर्ग कंटक, शिकारी या लोकांसाठी या आगी लावणे खूप सोपे असते, परंतु निसर्गाची पुढील पंचवीस वर्षे भरून न येणारी हानी होत असते.
आग विझविण्यासाठी साधने कमी....
आग विरोधी कपडे, बूट, टोप्या, तसेच फायर बॉल्स, ड्रोन अशी हत्यारे प्रशासनाकडे नसल्याने कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो. वनखात्याकडे आधीच अपुरे मनुष्यबळ, तसेच आग विरोधी संसाधनांचा अभाव असल्याने या आगी विझवायला खूप वेळ लागतो.
वर्षानुवर्षे या आगी लागत असताना प्रशासन मात्र ढिम्म असते. पर्यावरण, पाऊस, उत्तम वातावरण, सुबत्ता, पाणी हे सगळे या जंगलांवर अवलंबून असल्याने, ते वाचविण्यासाठी प्रशासनाने ताबडतोब पाऊल उचलणे गरजेचे आहे. वनखात्याचे स्वतःचे टँकर, आगविरोधी बंब असणे आवश्यक आहे. दुर्गम भागात अग्निशमन गाड्या आतमध्ये जाऊ शकत नाहीत, अशा वेळी लांब हाउस पाइपही कामी येऊ शकतात, त्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे.