माजलगाव : तालुक्यातील सोन्नाथडी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभारी पदभार काढून घेतल्यामुळे गुरूवारी दिव्यांग शिक्षक सदाशिव भालेराव यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.सोन्नाथडी येथे जि. प. ची केंद्रिय शाळा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भालेराव यांच्याकडील प्रभारी मुख्याध्यापक पद काढून घेऊन ते व्ही.पी.सोळंके यांना देण्यात आले. त्यावर भालेराव यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुख्याध्यापक पदाचा पदभार एस. एस. बडे यांच्याकडे देण्यात आला. बडे यांनी पदभार हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण न करता कामकाज सुरू केले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. महामुनी यांनी भालेराव यांच्या अभिलेख्यांच्या कपाटास सील केले होते. त्यामुळे ते निराश झाले होते. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून सोबत आणलेली पेट्रोलची बाटली स्वत:च्या अंगावर ओतून घेतली. काडी ओढण्याच्या आत कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. या घटनेनंतर फौजदार एस. एस. अंधारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भालेराव यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध शहर ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)
दिव्यांग शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: April 6, 2017 23:15 IST