हिंगोली : जिल्हा व्यापारी महासंघामध्ये फूट पडली असून, माजी सचिव श्यामसुंदर मुंदडा यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यमान अध्यक्षाविरूद्ध आरोप करीत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. याबाबत रविवारी पत्रपरिषद घेऊन माहिती देण्यात आली.शहरातील औद्योगिक सहकारी वसाहतीत झालेल्या या पत्र परिषदेस नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष सावरमल अग्रवाल, सचिव श्यामसुंदर मुंदडा, चंद्रशेखर निलावार, उपाध्यक्ष बाळासाहेब आरळकर, सहसचिव कमलकिशोर बगडिया, कोषाध्यक्ष गजानन उदावंत, सदस्य शेख करीम शेख छोटू, श्यामअण्णा मुंदडा, दीपक कटके, हनुमंत तळेकर यांची उपस्थिती होती. ११ महिन्यांपूर्वी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्याम देवडा यांचे निधन झाल्यामुळे अध्यक्षपदी रमेशचंद्र बगडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या कार्यकारिणीत सचिवपदी असलेले मुंदडा यांना नंतर पदावरून काढण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नवीन कार्यकारिणीची बैठक बन्सल आॅईल मील येथे घेण्यात आली. आॅगस्ट महिन्यात मराठवाडास्तरीय व्यापारी मेळावा घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पाच नावे व हिंगोली शहरातून ३१ नावे घेऊन ५१ व्यापाऱ्यांची कार्यकारिणी निवडली जाईल. त्यातून पदाधिकाऱ्यांचे संचालक मंडळ घोषित केले जाणार आहे. मराठवाडा चेम्बर आॅफ कॉमर्समध्ये उपाध्यक्षपदी चंद्रशेखर निलावार यांचे नाव राहील, असेही मुंदडा यांनी सांगितले. या कार्यकारिणीच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी नरसिंग देशमुख, मनमोहन सोनी, मुरली मुंदडा, ओमप्रकाश अग्रवाल, संजय देवडा आदी उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीतील सदस्यांनीही ही संघटना केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठीच काम करणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाभरातील व्यापारी तसेच समाजातील इतर घटकांच्या प्रतिनिधींचाही या महासंघात समावेश केला जाईल, असे सावरमल अग्रवाल म्हणाले. (प्रतिनिधी)‘मी पुण्यात आहे. हिंगोलीतील नवीन कार्यकारिणी निवडीबाबत मला काहीही कल्पना नाही, तेथे आल्यानंतर माहिती घेऊन बोलता येईल’- रमेशचंद्र बगडिया, अध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ.
जिल्हा व्यापारी महासंघात फूट
By admin | Updated: July 7, 2014 00:33 IST