हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेच्या होणाऱ्या विविध बैठकांमध्ये जि.प.च्या लघूसिंचन विभागाकडून कायम नकारघंटा वाजविली जात असल्याने जि. प. सदस्य आक्रमक झाले आहेत. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेण्यात आली. गतवर्षी जि. प. च्या लघूसिंचन विभागाला पाच कोटी रुपयांचा निधी जलयुक्त शिवार योजनेमध्ये मंजूर करण्यात आला होता. परंतु लघूसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मो.फैय्याज यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ही कामे करण्यास असमर्थता दर्शविली होती. या विभागापेक्षाही कमी मनुष्यबळ असलेल्या जलसंधारण विभागाने मात्र पाच कोटींची कामे केली. जि.प.च्या लघुसिंचन विभागाची नियमित कामेही फार मोठ्या प्रमाणात नाहीत. त्यामुळे जि.प.सदस्यांनी हाच मुद्दा रेटून धरत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांची भेट घेतली. जि.प.उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, गटनेते अनिल कदम, विनायकराव देशमुख यांच्यासह रामकिशन झुंझुर्डे, राजेंद्र शिखरे आदींची उपस्थिती होती. सदर मंडळीने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवाजी पवार यांचीही भेट घेतली. त्यांनीही गतवर्षी या विभागाला दिलेला निधी परत आल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनीही याबाबत संबंधित विभागाला बैठकीत विचारणा केली. त्यामुळे कामे करण्याची तयारी असल्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. जि. प. चे शिष्टमंडळ आता जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांची भेट घेणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. नव्या कामांसोबतच किरकोळ दुरुस्तीअभावी पाणी साठवता येत नसलेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचीही मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जि. प. सदस्यांचे जलयुक्तकडे लक्ष
By admin | Updated: December 18, 2015 23:29 IST