बीड : कोमेजलेली पिके, उजाड माळरान, आभाळाकडे लागलेल्या नजरा व शेतकऱ्यांचे हताश चेहरे हे सलग तीन वर्षांपासूनचे निराशाजनक चित्र यंदाच्या पावसाने बदलले आहे. वरूण राजा जिल्ह्यावर मेहेरबान असून, सलग चार दिवसांपासून मुक्कामी असलेल्या पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळीच पावसाला सुरूवात झाली. दुपारी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुन्हा पावसाने मनावर घेतले. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी बरसत होत्या. सरींवर सरी बरसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते पाण्याखाली गेल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. चाकरमान्यांचीही दाणादाण उडाली. बिंदुसरा, सिंदफणा या प्रमुख नद्या यंदा पहिल्यांदाच खळखळल्या असून, छोट्या नद्यांही तुडूंब भरून वाहत आहेत. आतापर्यंत कोरडे असलेले तलाव, धरण भरण्यास सुरूवात झाल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे. खरिपाची पिके बहरात असून, पावसाने उघडीप देताच खतांचा डोस देण्याबरोबरच मशागतीवर भर आहे. (प्रतिनिधी)
सर्वदूर पावसाने जिल्हा सुखावला
By admin | Updated: July 28, 2016 01:04 IST