परभणी : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली़ रात्रभरात सरासरी १५ मिमी पाऊस झाला़ यावर्षी पावसाने मोठा ताण दिल्याने जिल्ह्यातील पीकपरिस्थिती बेताची झाली होती़ पाऊस पडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला होता़ या पावसाने तब्बल अडीच महिन्यांची प्रतीक्षा करावयास लावली़ आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली़ दोन-चार बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे़ या पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना दिलासा मिळाला आहे़ पिकांची वाढ खुंटली होती़ पाऊस नसल्याने वातावरण रोगट बनले होते़ परिणामी असलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला होता़ अशा परिस्थितीत पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे शेतकरी सुखावला़ आठ-पंधरा दिवसांपासून सुरू असलेली पावसाची ये-जा चार दिवसांपूर्वी थांबली होती़ या विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री प्रथमच जिल्हाभरात पाऊस झाला़ जिंतूर तालुक्यात हा पाऊस सर्वाधिक झाला़ या तालुक्यात २४़३३ मिमी, परभणी ७़५०, पालम ९, पूर्णा १६़६०, गंगाखेड १७़७५, सोनपेठ १७़५०, सेलू १३़२०, पाथरी १० आणि मानवत तालुक्यात ११़६८ मिमी पाऊस झाला़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात सरासरी १५ मिमी पाऊस
By admin | Updated: September 7, 2014 00:30 IST