उस्मानाबाद : शहरासह परिसरातील तापमानाचा पारा ८ अंशावर घसरल्याने कडाक्याची थंडी पडली आहे़ वाढत्या थंडीमुळे आबालवृध्द हैराण झाले असून, सर्दी-खोकल्यासह इतर आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे़मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीचा पाऊस चांगला झाला आहे़ परतीच्या पावसामुळे रबीची पिके जोमात असून, वाढत्या थंडीमुळे काही पिकांना पोषक वातावरण असले तरी काही पिके धोक्यात आली आहेत़ शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा कडाका वाढला असून, ग्रामीण भागातील शेकोट्या पेटू लागल्या आहेत़ मागील तीन-चार वर्षात यंदाच्या थंडीची तीव्रता अधिक असल्याचे मत तापमान मापक कर्मचाऱ्यांनी सांगितले़ शहरासह परिसराचा पाराही चांगलाच घसरला आहे़ ५ व ६ जानेवारी रोजी पारा ९ अंशावर आला होता़ त्यानंतर ७ ते १० जानेवारी या कालावधीत किमान १० ते १२ अंशावर पारा राहिला़ त्यानंतर ११ जानेवारी रोजी ८़५, १२ जानेवारी रोजी ८ अंशावर पारा घसरल्याने थंडीचा कडाका वाढला होता़ १३ रोजी ९़९ अंश किमान तपमानाची नोंद झाली़ वाढलेल्या थंडीमुळे सर्दी-खोकल्यासह इतर आजारांनी आबालवृध्द हैराण आहेत़ शिवाय शासकीय, खासगी रूग्णालयातील विशेषत: बाल रूग्णालयातील रूग्णांची गर्दी वाढल्याचे जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे अबाल-वृध्दांना सर्दी- खोकल्यासह इतर काही आजार होत आहेत़ या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालावेत, सायंकाळी- सकाळी बाहेर फिरताना स्वेटर, मपलरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे़
जिल्हा गारठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:17 IST